जनहित न्यूज24 प्रतिनिधी:राजेंद्र देसरडा ( जैन फोटो )
राज्यातील कांदा दरात स्थिरता निर्माण करणे आणि शेतकरी, ग्राहक व व्यापाऱ्यांचे समतोल हित जपणे, या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने कांदा धोरण समितीची बैठक दिनांक 28 जुलै 2025 रोजी पुणे येथील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या कार्यालयात श्री. पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषि मुल्य आयोग यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीत लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा. सभापती श्री. ज्ञानेश्वर किसन जगताप आणि माजी सभापती तथा विद्यमान सदस्या सौ. सुवर्णा ज्ञानेश्वर जगताप यांनी सक्रीय सहभाग नोंदवून शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे प्रभावीपणे मांडले.
लासलगाव बाजार समितीच्या वतीने बैठकीत मांडण्यात आलेल्या सूचनांमध्ये, यावर्षी कांद्याच्या उत्पादनात झालेली मोठ्या प्रमाणावर वाढ, तसेच इतर राज्यातील लवकर येणारी आवक लक्षात घेता, येणाऱ्या काळात बाजारभाव घसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तात्काळ अल्पकालीन उपाययोजना राबविणे गरजेचे असल्याची शिफारस करण्यात आली. देशासाठी आवश्यकतेनुसार वापरल्या जाणाऱ्या कांद्याच्या प्रमाणानंतर शिल्लक राहणारा जादा कांदा प्रक्रियेद्वारे निकास करून जास्तीत जास्त प्रमाणात निर्यात करता यावा, यासाठी प्रयत्न करण्याची सूचना लासलगाव बाजार समितीने केली.
याप्रसंगी सौ. सुवर्णा जगताप यांनी मध्यंतरी झालेल्या धोरणातील बदलामुळे बांगलादेशसारख्या देशांनी स्वतः कांदा उत्पादन सुरू करून आपल्याकडून आयात कमी केली आहे. परिणामी आपण एक मोठा ग्राहक गमावला आहे. त्यामुळे युरोप व अमेरिका खंडांतील नव्या बाजारपेठा शोधून निर्यातीला गती देणे अत्यावश्यक असल्याचे सांगीतले. त्या पुढे म्हणाल्या, “कांद्याबाबत दीर्घकालीन धोरण निश्चित करणे गरजेचे आहेच, परंतु सध्याच्या बाजारस्थितीत कांद्याच्या घसरणाऱ्या दरांना तातडीने उत्तर देणारे अल्पकालीन निर्णयही तितकेच महत्त्वाचे आहेत.”
या चर्चेच्या अनुषंगाने समितीचे अध्यक्ष श्री. पाशा पटेल यांनी सांगितले की, “ही समिती कांदा पिकाचे दीर्घकालीन धोरण निश्चित करण्यासाठी गठित करण्यात आली आहे आणि ते काम निश्चितच पूर्ण करण्यात येईल. मात्र, सद्यस्थितीत कांद्याचे दर आणखी घसरू नयेत आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे योग्य मूल्य मिळावे, यासाठी सध्या उपलब्ध आकडेवारीच्या आधारे लवकरच मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि मा. पणन मंत्री श्री. जयकुमार रावल यांच्याकडे यांची भेट घेवुन परिस्थीतीचे अवलोकन करुन देण्यात येईल.”
याव्यतिरिक्त, बैठकीत कांद्याच्या आयात-निर्यात धोरणाचे पुनरावलोकन, चाळ साठवण क्षमतेत वाढ, उत्पादन माहितीतील अचूकता, नाफेडमार्फत बाजार समित्यांमध्ये प्रभावी खरेदी, जागतिक बाजारपेठांचा अभ्यास, आणि उत्पादन खर्च निश्चिती या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.
या बैठकीस राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष श्री. पाशा पटेल, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक श्री. संजय कदम, देशांतर्गत व्यापार प्रमुख श्री. सुहास काळे, कृषी आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिकी वैभव तांबे, निर्यातदार श्री. दानिश शहा, विविध कृषितज्ज्ञ, शेतकरी व व्यापारी प्रतिनिधी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.




टिप्पणियाँ0