GpYiTUGoGUM8BSO8TUWiTSA5Gi==

केंद्र सरकारच्या कृषि आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची लासलगांव बाजार समितीस भेट – ज्ञानेश्वर जगताप.


 जनहित न्यूज24 प्रतिनिधी :राजेंद्र देसरडा ( जैन फोटो )



         खरीप हंगाम 2025 मधील कांदा पिकाचे क्षेत्र, अंदाजित उत्पादन व सद्यस्थितीतील बाजार समित्यांमधील आवक, बाजारभाव तसेच निर्यात विषयक धोरण आणि शेतकरी व व्यापारी वर्गाच्या अडी-अडचणींबाबत चर्चा करणेसाठी केंद्र सरकारच्या कृषि आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज (दि. 16) रोजी लासलगांव बाजार समितीस भेट दिली असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर (डीके) जगताप यांनी दिली.






केंद्र सरकारच्या कृषि आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज लासलगांव बाजार समितीस भेट देऊन उपस्थित असलेले बाजार समितीचे सदस्य, शेतकरी व व्यापारी प्रतिनिधींकडुन खरीप हंगामात होणाऱ्या कांदा ह्या शेतीमालाचे उत्पादन, उत्पादनासाठी येत असलेला खर्च तसेच चालु रब्बी हंगामातील शिल्लक कांदा,  त्यास मिळत असलेले बाजारभाव, शेतकरी, नाफेड व एनसीसीएफ यांचेकडील साठवणुक केलेला कांदा तसेच कांदा निर्यात धोरण ठरविण्यासाठी निर्यातदारांना येत असलेल्या अडी-अडचणींसंदर्भात प्रत्यक्ष माहिती जाणुन घेतली.



सदर प्रसंगी बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप, उपसभापती संदीप दरेकर यांचेसह उपस्थित असलेल्या सदस्य मंडळाने व शेतकरी प्रतिनिधींनी चालुवर्षी उन्हाळ (रब्बी) कांद्याचे झालेले उत्पादन, मिळत असलेले बाजारभाव व शिल्लक कांदा तसेच येणाऱ्या हंगामातील पोळ / रांगडा (खरीप / लेट खरीप) कांद्याची लागवड इ. ची माहिती देऊन स्थानिक पातळीवर दरवर्षी कांदा पिकाची झालेली लागवड, उत्पादन, उत्पादनासाठी येत असलेला खर्च, मिळत असलेले बाजारभाव इ. बाबींची कृषि, पणन, महसुल व बाजार समित्या यांचेकडुन सविस्तर माहिती घेऊन त्याप्रमाणे निर्यातीबाबत योग्य ते धोरण ठरवावे. जेणेकरून शेतकरी बांधव व व्यापारी वर्गास कांदा ह्या शेतीमालासाठी योग्य दर मिळतील. त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांसाठी लागणारे बि-बियाणे, औषधे, रासायनिक खते, इंधन व शेती औजारांवरील वस्तु व सेवाकर कमी अथवा रद्द करावा. तसेच केंद्र शासन इतर शेतीमालासाठी ज्या पध्दतीने आधारभुत किंमत निश्चित करते. त्याप्रमाणेच कांद्याची आधारभुत किंमत निश्चित करून विशिष्ट रकमेच्या वर कांद्याची विक्री झाल्यास निर्यातीवर कोण-कोणत्या प्रकारची बंधने लावावी यासंदर्भात दिर्घकालीन धोरण निश्चित करून शेतकरी, व्यापारी व ग्राहकांना माहिती प्रसिध्द करावी. त्याचप्रमाणे कांदा पिकाची उत्पादन खर्चाच्या आत विक्री झाल्यास इतर राज्यांप्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, कांद्यावर प्रक्रिया उद्योग उभारावे, काही देशांमध्ये सफेद कांद्याची मागणी असते त्यासाठी सफेद कांद्याचे बियाणे शासनाने मोफत उपलब्ध करून द्यावे इ. बाबत माहिती दिली.    





तसेच जास्तीत जास्त कांदा रेल्वेने पाठविण्यासाठी व्यापारी वर्गास मुबलक प्रमाणात रॅक उपलब्ध करून द्याव्या. सदरच्या रॅक वेळेत पोहोचतील यासाठी प्रयत्न करावे, किंमत स्थिरीकरण निधीअंतर्गत नाफेड व एनसीसीएफ मार्फत होणारी कांदा खरेदी बंद करावी, कांदा निर्यातीसाठी इतरही देशांशी करार करावे, शासनाने तात्काळ कांदा निर्यातबंदी न करता पुर्वसुचना द्यावी, कांद्यापासुन इतर उपपदार्थ तयार करणेसाठी तंत्रज्ञान विकसित करावे, इतर देशांच्या तुलनेत भारतातुन निर्यात होत असलेला कांदा व केंद्र शासनाकडुन वेळोवेळी कांदा निर्यातीवर लादण्यात येणाऱ्या प्रतिबंधांमुळे कांदा व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणींसह कांद्याचे धोरण ठरविणेसाठी आगामी काळात केंद्र शासनाने त्या-त्या राज्यातील कांदा उत्पादक क्षेत्रातील संबंधित प्रतिनिधींची समिती गठित करून आगामी काळात जास्तीत जास्त कांदा निर्यात होणेसाठी व्यापाऱ्यांना वाहतुकीवर अनुदान द्यावे इ. मागण्या व्यापारी वर्गाने केल्या.

याप्रसंगी सुभाष कोटकर, विभागीय कृषि सहसंचालक, महेश वेटेकर, कृषि उपसंचालक, रविंद्र माने, जिल्हा अधिक्षक, कृषि विभाग, नाशिक, तानाजी खर्डे, उपविभागीय कृषि अधिकारी, फयाज मुलाणी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक, कांतीलाल गायकवाड, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, निफाड, बाजार समितीचे सदस्य जयदत्त होळकर, राजेंद्र डोखळे, छबुराव जाधव, सुवर्णा जगताप, डॉ. श्रीकांत आवारे, प्रविण कदम, बाळासाहेब दराडे, सचिव नरेंद्र वाढवणे, सहसचिव प्रकाश कुमावत, व्यापारी प्रतिनिधी नितीन जैन, मनोज जैन, विकास सिंग, शेतकरी प्रतिनिधी अभिजीत डुकरे आदि उपस्थित होते.     

सदर प्रसंगी बाजार समितीच्या वतीने आलेल्या अधिकारी वर्गाचा शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

टिप्पणियाँ0

Type above and press Enter to search.